Contact : 022-24054714, 24057268

तिसरी राज्यस्तरीय विज्ञान आणि गणित शिक्षक परिषद

कार्यशाळा

महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, वर्गांमध्ये शिकविताना त्यांच्या स्वत:च्या काही विशेष व नावीन्यपूर्ण पध्दतीचा अवलंब करताना आढळतात. यामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग, काही प्रारूपे,तालिका,नकाशे, चित्रे इत्यादींचा समावेश असतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे काही शिक्षक स्वत:च्या वेबसाईटही बनवतात, तसेच या नावीन्यपूर्ण पध्दती इतर शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी व्हॉटसअॅप,फेसबुक,ट्वीटर,या समाजमाध्यमांचाही उपयोग केला जातो. परंतु तरीदेखील हे मार्ग अपुरेच पडतात व शिक्षकांच्या या नावीन्यपूर्ण पध्दतींचे इतर शिक्षकांसमावेत अपेक्षेइतके आदान प्रदान होत नाही. यावर एक उपाय शोधण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेने(मविप) पुढाकार घेतला आहे. मविप ही ५3 वर्षाची जुनी, मुख्यत: ज्ञान संवर्धन व विशेषत: विज्ञान प्रसाराच्या कार्याला वाहून घेतलेली संस्था आहे. मविपला असे जाणवले की अशा कल्पक शिक्षकांना एकाच व्यासपीठावर आणावे आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती मोठ्या शिक्षक समूहासोर सादर करण्याची संधी मिळावी.यानुसार, मविपने याआधी २०१६, २०१७ व २०१८ यावर्षी तीन राज्यस्तरीय विज्ञान आणि गणित शिक्षक परिषदांचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च(आयसर), पुणे येथे केले होते ज्यामध्ये अनुक्रमे ७०, ६५ व ३४ शिक्षकांचा सहभाग होता. २०१६ या वर्षीच्या परिषदेचा मुख्य विषय ‘कृतीतून विज्ञान शिक्षण’ व २०१७ व २०१८ या वर्षीच्या परिषदांचा मुख्य विषय ‘मूल्यमापन’ होते.

या परिषदांमधील सहभागींना परिषदेच्या विषयावर शोध निबंध लिहून तो परिषदेमध्ये सादर करायचा होता, ज्यामध्ये एकाच वेळी एकपेक्षा अधिक वर्गात सादरीकरणाचा कार्यक्रम सुरू होता.सहभागींना शोधनिबंध सादर करण्यासाठी ८ मिनिटाचा अवधी दिला गेला.सादरीकरण सदीप पध्दतीने (Power Point Presentation) अथवा साधे मौखिक सादरीकरण करायचे होते. प्रत्येक सादरीकरणानंतर सादरीकरण करणारे सहभागी आणि सादरीकरणाचे मूल्यमापन करणारे तज्ञ (दोन) व त्या गटामधील इतर सहभागी यांच्यामधील प्रश्नोत्तरासाठी २ मिनिटाचा अवधी दिला गेला. सादरीकरणाचे सत्र संपल्यावर त्या त्या वर्गातील दोन उत्तम सादरीकरणांची निवड करण्यात आली व त्यांना समारोपाच्या कार्यक्रमात गुणवत्ता प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रत्येक वर्गातील प्रथम क्रमांकाचे सादरीकरण करणा-या सहभागीना आयसरतर्फे ५/६ आठवड्यांचे प्रशिक्षण मिळण्याची संधी दिली गेली. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च आयसर करेल अशीही घोषणा करण्यात आली.

या परिषदांमध्ये सहभागींना इतक्या मोठ्या शिक्षकसमूहासमोर सादरीकरणाची संधी मिळण्याव्यतिरिक्त इतर सहभागींचे सादरीकरण बघण्याची संधी मिळाली.या सर्व सहभागींना शिक्षक परिषदेपासून झालेला लाभ बघता अशा प्रकारचा लाभ महाराष्ट्रातील अधिकाधिक शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी मविपने अशा प्रकारच्या परिषदा २०१६ या वर्षापासून ५ वर्षांसाठी आयोजित करण्याचे ठरवले आहे.यानुसार, चवथी विज्ञान व गणित शिक्षक परिषद नोव्हेंबर/डिसेंबर २०१९मध्ये आयसर, पुणे येथे आयोजित करण्यात येईल. या परिषदेचा विषय ‘विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत विचार करण्याची क्षमता विकसित करून तिचे मूल्यमापन करण्याविषयीचा माझा प्रकल्प’ असेल. तसेच पहिल्या तीन राज्यस्तरीय विज्ञान व गणित शिक्षक परिषदांचा आढावा घेऊन व त्यामध्ये सहभागींनी केलेल्या सूचनांवर विचार करून मविपने चवथ्या विज्ञान व गणित शिक्षक परिषदेच्या पूर्वतयारीसाठी १० मे २०१९ रोजी आयसर, पुणे येथे कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरवले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश असेल.


१ परिषदेचा विषय व उपविषय व त्यांच्या अनुषंगाने संशोधन पध्दती संभाव्य सहभागींना अधिक स्पष्ट करून सांगणे.
२ सादरीकरणात संख्याशास्त्रातील संकल्पना/ तंत्रांचा अवलंब कसा करावा हे सांगणे
३ सादरीकरण सदीप पध्दतीने (Power Point Presentation) कसे करणे व त्यासंबंधातील गोष्टी.

या कार्यशाळेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ) महाराष्ट्र व गोवा राज्यातील ६वी ते १२वी च्या वर्गांना विज्ञान व गणित शिकविणारे शिक्षक व विज्ञान प्रसारक कार्यशाळेत व शिक्षक परिषदेत सहभागी होऊ शकतात.
ब) कार्यशाळेसाठी श्री प्रकाश मोडक (इ-मेल modakmvp@gmail.com आणि भ्रमणध्वनी क्रमांक 9920329984) समन्वयक आहेत. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणा-या व्यक्तींनी खालील वैयक्तिक तपशीलासह श्री प्रकाश मोडक यांच्याशी दिनांक २५ एप्रिल २०१९ पर्यंत इ-मेल द्वारे संपर्क करावा.
1. पूर्ण नाव २. निवासस्थानाचा पत्ता ३. शिकवत असलेल्या शाळेचे /महाविद्यालयाचे /संस्थेचे नांव ४. इ-मेल ५. संपर्क क्रमांक (भ्रमणध्वनी आणि /किंवा दूरध्वनी क्रमांक) ६. शिकवत असलेले वर्ग (इयत्ता) ६ वी ते १२ वी यापैकी कोणते ते. ७.शिकवत असलेला/असलेले विषय.
क) ही कार्यशाळा निशुल्क असून कार्यशाळेच्या दिवशी चहा व जेवणाची व्यवस्थाही निशुल्क केली जाईल. कार्यशाळेसाठी बाहेरगावच्या (पुणे व्यतिरिक्त निवास स्थान असलेल्या) काही मर्यादित संख्येपर्यंतच्या सहभागींची कार्यशाळेच्या आदल्या रात्रीच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था आयसर येथे निशुल्क केली जाईल.
ड) (१) कार्यशाळेतील सहभागी ज्यांचे निवास स्थान पुणे शहर, त्याची उपनगरे आणि पुणे जिल्हा यामध्ये कुठेही असल्यास हे सहभागी कार्यशाळेत उपस्थित रहाण्याकारीता प्रवास खर्चाच्या परताव्यासाठी पात्र धरले जाणार नाहीत.
(२) मुंबईतील दहिसर, ठाणे शहर, व नव्या मुंबईत पनवेलपर्यंत वास्तव्य असलेल्या सहाभागींकरीता आयसर पुणे येथे जाण्याकरीता व परतीच्या प्रवासासाठी मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२ येथून बसची व्यवस्था केली जाईल. ही बस मविप कार्यालय येथून कार्यशाळेच्या आदल्या दिवशी (९ मे २०१९ रोजी) दुपारी ४.०० वाजता सुटेल व दिनांक १० मे२०१९ रोजी कार्यशाळेच्या समारोपानंतर रात्री १०.३० वाजेपर्यंत दादर टी. टी.ला. परत येईल.यां सहाभागींकरीता वरील प्रमाणे प्रवास व्यवस्था, आयसर येथे दिनांक ९ मे २०१९ रोजी निवास व्यवस्था व आयसर येथील वास्तव्यातील चहा, नाश्ता व भोजन व्यवस्था निशुल्क असेल.

(३) जे सहभागी वरील ड(२) मध्ये दर्शविलेल्या प्रवास सुविधेसाठी पात्र असतील पण ही सुविधा घेणार नाहीत त्यांनी कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता स्वत:ची प्रवास व्यवस्था करणे जरूरीचे आहे व कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ते प्रवासखर्चाच्या परताव्यासाठी पात्र समजले जाणार नाहीत. इ) प्रवास खर्चासाठीची पात्रता:

जे, सहभागी वरील ड(१) व ड(२) या गटात येत नाहीत ते प्रवास खर्चाच्या परताव्यासाठी खालीलप्रमाणे पात्र असतील.

१. निवासस्थानापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन अथवा सर्वात जवळचा एसटी बस स्टॉप ते कार्यशाळेच्या स्थानाजवळील (आयसर, पुणे) रेल्वे स्टेशन अथवा सर्वात जवळचा एसटी बस स्टॉप याच्या यायच्या व परतीच्या प्रवासाच्या रेल्वेच्या दुस-या वर्गाच्या साधारण /शयनयान (वातानुकुलीत नसलेल्या ) किंवा साधारण एस टी बसच्या (वातानुकुलीत नसलेल्या) भाड्याचा परतावा. यासाठी कमीत कमी एका वेळच्या प्रवासाचे तिकीट अथवा पावती सादर करणे गरजेचे आहे.
२. प्रवास स्वत:च्या वाहनाने अथवा उच्च श्रेणीने केल्यास परताव्याची रक्कम वरील क्रमांक १ मध्ये दर्शविलेल्या प्रमाणे दिली जाईल.
३. निवासस्थानाच्या जागी व कार्यशाळा असलेल्या शहरात (पुणे येथे) रेल्वे स्थानक /एस टी बस स्थानक / कार्यशाळेचे प्रत्यक्ष स्थान याठिकाणी पोचण्यासाठी टॅक्सी(taxi)/ ऑटोरिक्षाने केलेल्या प्रवासाच्या भाड्याचा परतावा देय नसेल.
फ) जर वरील ड(२) मध्ये येणा-या सहाभागींची संख्या ३५चे आसपास असेल तर त्यांच्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा २ मे ते ८ मे या कालावधीत स्वतंत्रपणे मराठी विज्ञान परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात आयोजित केली जाईल. अशा प्रकारे कार्यशाळेचे आयोजन केल्यास ह्या व्यक्ती आयसर, पुणे येथील कार्यशाळेत सहभागी होण्यास पात्र नसतील. तसेच परिषदेत आयोजित केलेल्या कार्यशाळेतील सहभागासाठीच्या प्रवास खर्चासाठी देखील ते पात्र नसतील. परंतु अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करणे पूर्णपणे परिषदेच्या अखत्यारीत असेल.
ग) कार्यशाळेतील सहभागीना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात येईल व प्रवास खर्चाचा परतावा कार्यशाळेच्या समारोपानंतरच दिला जाईल.


चवथ्या राज्यस्तरीय विज्ञान आणि गणित परिषदेचे मुख्य विषय व उपविषय

मुख्यविषय

विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत विचार करण्याची क्षमता विकसित करून तिचे मूल्यमापन करण्याविषयीचा माझा प्रकल्प

प्रास्ताविक

मौलिक विचार करणाऱ्या व्यक्ती खालील लक्षणांवरून ओळखता येतात:


1. अशा व्यक्तींना फार मोठ्या प्रमाणांत कल्पना सुचतात. ते अत्यंत कल्पक असतात. कधी कधी ते एखाद्या कल्पनेवर खूप वेळ विचार करत राहतात आणि आर्किमिडीजला ज्याप्रमाणे एका क्षणाला खूप वेळ डोक्यात असलेले कोडे उलगडले आणि तो आनंदाने नाचत सुटला त्याप्रमाणे एखाद्या ‘युरेका’ क्षणाला त्यांना ती कल्पना उलगडते.


2. त्या अत्यंत जिज्ञासू असतात आणि त्यांना सतत प्रश्न पडत असतात. त्यांची दृष्टी हा काळा आणि हा गोरा अशी टोकांची नसते, तर त्यांना मधलेही ‘रंग’ दिसतात. ते रूढ, प्रचलित विचारापेक्षा वेगळा, भिन्नमार्गी विचार करतात.


3. ते अतिशय स्वयंप्रेरित असतात, आणि अनेक वेळा चढाओढखोर, कधी कधी अगदी आक्रमक स्वरूपांतही, असतात.


4. स्वत:च्या कल्पनांविषयी त्यांना आत्मविश्वास असतो. त्यांना संवादाची कला चांगली अवगत असेलच असे नाही, पण आपल्या कल्पनांवरते ठाम असतात. त्यांच्यात कधीकधी नेत्रुत्वगुण असतात, मात्र कधीकधी ते एकलकोंडे असतात.मौलिक विचारांच्या अभावी जे कृतिक्रम पूर्ण होऊ शकणार नाहीत असे कृतिक्रम दोन प्रकारचे असतात: 1) समस्या निरसन आणि 2) निर्मिती. विद्यार्थ्यांबरोबर प्रकल्प घेताना वर उल्लेखलेली मौलिक विचारक्षमतेची चार लक्षणे कृतिक्रमांच्या या दोन प्रकारांच्या संदर्भांत लक्षात घ्यायला हवीत. मुख्य विषयाखालील सात उपविषय या दोन प्रकारांत मोडतातः उपविषय 1, 2, 6 आणि 7 समस्या निरसन (अभिकल्प धरून) प्रकारचे आहेत, तर उपविषय 3, 4 आणि 5 निर्मितीप्रकारचे (लेखन, चित्रकाम आणि अभिनय असे कलाविष्कार धरून) आहेत.


खाली प्रत्येक उपविषयांतर्गत प्रकल्प कसा पुढे न्यायचा या दृष्टीने काही सूचना-वजा-मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. तुम्ही येथे दिलेल्या सूचनांनुसारच गेले पाहिजे असे नाही. तुम्ही आपला स्वतंत्र मार्ग अवलम्बला तरी हरकत नाही.


उपविषय १ : निसर्गात जाऊन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे


येथे निसर्गातील कोठचे ठिकाण भेटीसाठी निवडायचे येथूनच मुलांचा सहभाग घेता येईल. विद्यार्थ्यांची निवड त्यांची विचारक्षमता दाखवू शकेल. भेटीमध्ये कोणाला जास्त रूची आहे, कोण जास्त जिज्ञासू आहे, कोणाला जास्त प्रश्न पडतात, कोणाचे निरीक्षण जास्त नेमके आहे, दिसणाऱ्या गोष्टींचा संबंध ते दुसऱ्या गोष्टींशी, विशेषत: आधी शिकलेल्या गोष्टींशी, लावू शकतात, त्यांचे निष्कर्ष किती अचूक, योग्य आणि वेगळे आहेत का, कोण कल्पक आहे, कोणाचे विचार प्रगल्भ आणि निराळे आहेत, अशा विविध बाबींतून विद्यार्थ्यांची मौलिक विचार करण्याची क्षमता तपासता येईल. तसेच याबाबीत विद्यार्थ्यांना प्रयत्न करण्यास उद्युक्त करता येईल; तसेच प्रयत्न करणाऱ्यांना उत्तेजन, शाबासकी देणे हेही महत्त्वाचे आहे.


उपविषय २ : एखाद्या प्रयोगाची रचना करणे


विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अजून यावयाचा आहे असा विषय देऊन, उदाहरणार्थ, ६वी - ७वीच्या विद्यार्थ्यांना, प्रकाश सरळ रेषेत जातो हे कसे दाखवता येईल हा विषय देऊन प्रयोग सुचवायला सांगावे. किंबहुना विद्यार्थ्यांचे, ३-४ जणाचे असे लहान गट करून, त्यांनी सुचवलेल्या विषयाच्या प्रयोगाची संकल्पना बांधून तो प्रत्यक्षात उतरावयाला सांगावा. यातून विद्यार्थ्यांची कल्पकता, तार्किक विचारशक्ती, निरीक्षणशक्ती, प्रयोगाचे सामान निवडताना आणि ते वापरून प्रयोग बांधताना त्याची हाताने काम करण्याची कुवत व व्यवहारज्ञान, केलेल्या प्रयत्नाचे मूल्यमापन करण्याची आणि चुका झालेल्या असल्यास त्या सुधारण्याची वृत्ती, सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची क्षमता, चिकाटी, नेतृत्वगुण अशी मौलिक विचारक्षमतेशी संबंधित लक्षणे तपासता येतील व त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना प्रवृत्त करता येईल, तसेच उत्तेजन देता येईल.


उपविषय ३ : एखादी भूमिका वठवणे


कोणती भूमिका वठवायची हेही विद्यार्थ्यांकडून काढून घ्यावे. त्यांतून त्यांची कल्पकता व विचारशक्ती दिसून येईल. त्यांच्या मांडणीतून त्यांची विषयाची आणि त्यात नेमके महत्त्वाचे काय याची समज कितपत दिसून येते, त्यांची कल्पकता – अभिव्यक्ती – अभिनय यांचा दर्जा काय आहे, त्यांच्या सादरीकरणात नावीन्य आणि वेगळेपण आहे का हे तपासणे आवश्यक आहे. तसेच त्यांना गुणवत्ता वाढीसाठी प्रवृत्त करणे आणि केलेल्या प्रयत्नांतील चांगल्या गोष्टी नमूद करून उत्तेजन देणे ही जरूर आहे.


उपविषय ४ : ३-४ विद्यार्थ्यांच्या गटाला एखादा विज्ञान/तंत्रज्ञान संबंधीचा विषय देऊन निबंध लिहायला सांगणे. प्रत्येक गटाचा विषय वेगळा असेल. उदाहरणार्थ, अ) घर्षण नसेल तर, आ) जर आपल्याला वासाचे इंद्रीय नसते तर, आणि इ) जर पृथ्वीवर ऑक्सिजन नसता तर.


यात काय करावे हे उपविषय देतानाच स्पष्ट केलेले आहे. निबंधाचे विषय नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळे आहेत, त्यांतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला तसेच अभ्यासूवृत्तीला चालना मिळेल. विद्यार्थी वैज्ञानिकदृष्ट्या किती अचूक विचार करतात, हे मात्र तपासायला हवे. या आणि इतर उपविषयाबाबतीत विद्यार्थी इंटरनेटवरून जशीच्या तशी माहिती घेण्याची शक्यता आहे, त्याबाबतीत अध्यापक–मार्गदर्शकांनी जागरूक राहायला हवे.


उपविषय ५ : विज्ञान आणि गणिताच्या संकल्पना व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडणे


यामध्ये विद्यार्थी कोणता विषय निवडतात आणि त्याचे व्यंगचित्रीय रूपांतर कसे करतात हे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे द्योतक आहे. त्यांचे चित्रकलेचे कौशल्य, व्यंगचित्रकलेची जाण आणि मूळ विषयाची समज याबाबीही लक्षात घ्यायला हव्यात. जो विद्यार्थी या तऱ्हेची क्षमता दाखवेल त्याला शाबासकी आणि उत्तेजन देणे विसरता कामा नये.


उपविषय ६ : घरातील टाकाऊ वस्तू वापरून विज्ञान व गणिताच्या संकल्पनांवर आधारीत स्वस्तातील खेळणी बनवणे


येथे विषयाची निवड विद्यार्थ्यांवर सोपवल्यास याबाबतीतील त्यांची समज व कल्पकता यांचा अंदाज घेता येईल. उपविषय २ प्रमाणे विद्यार्थ्यांना लहान गटात काम करायला आणि प्रकल्प पूर्णत्वाला न्यायला सांगावे. उपविषय २ मध्ये दिल्याप्रमाणेच येथे विद्यार्थ्यांच्या मौलिक विचारशक्तीचे मूल्यमापन करणे, त्यांना असा विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्यांच्या प्रयत्नांना उत्तेजन देणे हे साधता येईल.


उपविषय ७ : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधने / पद्धती विकसित करणे


या विषयात मुलांच्या कल्पना शक्तीचा कस लागणार आहे कारण प्रथम मुलांना दिव्यांगांच्या अडचणी समजावून घ्याव्या लागणार आहेत; एका अर्थी त्यांच्या भूमिकेत शिरावे लागणार आहे, आणि नंतर त्यांना खऱ्या अर्थाने उपयुक्त असे साधन वा पद्धती विकसित करावी लागणार आहे. हा नंतरचा भाग उपविषय २ आणि ६ प्रमाणेच तपासता येईल व विद्यार्थ्यांना याबाबतीत उत्तेजन देता येईल.


प्रकल्पाचे मूल्यमापन –


प्रकल्प किती परिणामकारक झाला आहे हे तपासण्यासाठी मूल्यमापन आवश्यक असते. आपण यासाठी पूर्व आणि उत्तर चाचणी पद्धत वापरू शकतो. पूर्व चाचणीचा उद्देश प्रकल्प सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची मौलिक विचारक्षमता किती आहे हे पाहणे असेल. पूर्व चाचणीनंतर आपण निवडलेल्या उपविषयानुसार प्रकल्पाची कार्यवाही करायची आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरचाचणी द्यायची. पूर्व आणि उत्तर चाचणीतील गुणांचा फरक प्रकल्पाची गुणवत्ता दाखवतो. या चाचण्या तयार करणे हे तुमचे कौशल्य असेल.


तुम्ही प्रकल्प चालू असताना विद्यार्थ्यांच्या कामाचे आणि वर्तणुकीचे निरीक्षण करू शकता. याकरता त्यांच्या कामाचे आणि वर्तणुकीचे घटक ठरवून प्रत्येक घटकाबाबतीत विद्यार्थ्यांना गुण द्यावेत. अशी निरीक्षण-गुण-तालिका प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रकल्पापूर्वी, प्रकल्प चालू असताना एक किंवा दोन वेळा आणि प्रकल्पानंतर अशी एकूण तीन-चार वेळा भरावी. त्याद्वारे प्रकल्प जसजसा पुढे जातो, तसतशी विद्यार्थ्यांची प्रगती कशी होती याची नोंद होते व प्रकल्पाचे अंतिम मूल्यमापन करणे सोपे होते.


तुम्ही पूर्व आणि उत्तर चाचणी पद्धत किंवा निरीक्षण पद्धत किंवा दोन्ही पद्धती संयुक्तपणे वापरू शकता. तुम्ही केलेल्या मूल्यमापनाला विद्यार्थ्यांनी स्वत:च केलेल्या आपल्या – स्वयंमूल्यमापनाची - जोड देता येईल. यासाठी तुम्ही तयार केलेली निरीक्षण-गुण-तालिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांना भरायला सांगावी. तसेच विद्यार्थी सुरूवातीला कोठे होते आणि प्रकल्पामुळे त्यांच्यात कसकसा बदल होत गेला याविषयीची तुमची आणि विद्यार्थ्यांची गुणात्मक निरीक्षणेही मूल्यमापनासाठी महत्त्वाची आहेत. विद्यार्थ्यांना मूल्यमापनात सामील करून घेणे म्हणजे त्यांना आपल्या विचारक्षमतेबद्दल विचार करायला लावणे, त्यांनी शिकावे कसे हे शिकण्यासाठी हे तंत्र अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे मानले जाते.


मराठी विज्ञान परिषद, मुंबई व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च(आयसर), पुणे येथे अनुक्रमे दिनांक ४ व १० मे २०१९ रोजी चौथ्या राज्यस्तरीय विज्ञान आणि गणित शिक्षक परिषदेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या कार्यशाळांमधील तज्ञांची संदीप सादरीकरणे खालील लिंक्सवर उपलब्ध आहेत.

दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी आयसर, पुणे येथे संपन्न झालेल्या तिस-या राज्यास्तारिय शिक्षक परिषदेतील काही शोध निबंध खालील लिंक्सवर उपलब्ध आहेत..चौथी राज्यस्तरीय विज्ञान आणि गणित शिक्षक परिषद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च(आयसर), पुणे येथे दिनांक २४ डिसेंबर २०१९रोजी होईल.चौथ्या राज्यस्तरीय विज्ञान व गणित शिक्षक परिषदेच्या नोंदणीसाठी २०ऑगस्ट २०१९ चे आसपास या संकेतस्थळावर गुगल लिंक दिली जाईल.परंतु शिक्षकांना शोध निबंध लिहिण्याचे दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून शोध निबंध लिहिण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना खालील लिंकवर उपलब्ध आहेत.मराठी विज्ञान परिषदेचा पत्ता

मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना.पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०० ०२२
फोन क्रमांक: ०२२-२४०५४७१४ / २४-२४०५७२६८
इ -मेल: office@mavipamumbai.org
वेबसाइट: www.mavipamumbai.org / www.scienceteacherscongress.org